१९८० चे दशकामध्ये जुन्नर / आंबेगांव हे तालुके म्हणजे मागासलेले व दुर्गम डोंगरी भागातील अविकसीत तालुके म्हणून ओळखले जात होते. सिंचनाची कोणतीही सोय नसलेने शेतकऱ्यांचा कल पारंपारीक पिके घेण्यावरच होता. सर्व परिस्थीती पाहून शेतकऱ्यांचे जिवनमान उंचविण्यासाठी काहीतरी केले पाहीजे या जाणीवेतून एक माणूस झपाटल्या सारखा कामाला लागला तो माणूस म्हणजे स्व. खासदार निवृत्तीशेठ शेरकर.
पारंपारीक पीकांपासून शेतकऱ्यांना वळविण्यासाठी शेतीमालावर प्रक्रिया करणारा कारखाना म्हणजेच साखर कारखाना उभारण्याचा त्यांनी विडा उचलला. व १९८१ साली त्यांनी श्री विघ्नहर सह.सा.का.लि. ची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी त्यांनी दोन्ही तालुक्यातील विश्वासू साथीदारांना बरोबर घेतले व शेअर्स गोळा करण्यास सुरवात केली. त्याकामी त्यांना तात्कालीन मुख्यमंत्री कै.. वसंतदादा पाटील व माजी खासदार व माजी शालेय शिक्षणमंत्री कै. प्रा. रामकृष्णजी मोरे साहेब यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले. व १९८४-८५ साली कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम पूर्ण झाला.
एक दोन हंगाम कसेबसे पूर्ण केलेनंतर ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणावर घटले त्यावेळी संस्थापक चेअरमन स्व. मा. खासदार निवृत्तीशेठ शेरकर यांनी मा. श्री. पवार साहेबांचा सल्ला घेतला. त्यावेळी मा. श्री. पवार साहेब यांनी कारखान्याचा तोटा वाढू नये म्हणून हंगाम १९८७-८८ बंद ठेवण्याचा मौलिक सल्ला दिला व सदर हंगामातील ऊस अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना घालण्यात आला. या परिस्थितीवर मात करणेसाठी स्व. शेठबाबांनी मा. श्री. पवार साहेबांचा सल्ला घेवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व संचालक मंडळाला बरोबर घेवून शेतकऱ्यांच्या शेतावर पायी दौरे सुरु केले. व शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहीत केले. त्यानंतर १९८८-८९ मध्ये कारखाना चालू झालेनंतर कारखान्याने आजपर्यन्त मागेवळून पाहीले नाही. व अनेक विक्रम या कारखान्याच्या नावावर नोंदविले गेले.
ऊसाचे क्षेत्र वाढलेनंतर १९९२-९३ साली कारखान्याची गाळपक्षमता १२५० मे. टनावरुन २५०० मे. टनापर्यन्त वाढविली. सतत चांगला भाव शेतकऱ्यांना दिल्यामुळे ऊसाचे क्षेत्रामध्ये आणखी वाढ झाली व १९९५-९६ साली कारखान्याची गाळप क्षमता ५००० मे. टनापर्यन्त नेली. सतत तांत्रिक कार्यक्षमता योग्यरितीने राखून सतत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील बक्षिसे मिळविली आहेत. स्व. शेठबाबांचे एक तत्व होते ते म्हणजे मिळालेले उत्पन्न वजा झालेला खर्च व त्यामधून शिल्लक राहणारी रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात टाकायची यामुळे सभासद शेतकऱ्यांचा मोठा विश्वास शेठबाबांवर होता. या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावून त्यांना समाजामध्ये ताठ मानेने जगायला शिकविले. त्यामुळे लोक त्यांना आदराने देवमाणूस म्हणायचे.