१) को-जनरेशन प्रकल्प
स्व. माजी खासदार मा. निवृत्तीशेठ शेरकर यांनी राज्यातील विजेचे संकट लक्षात घेवून कारखान्याचे माध्यमातून विज प्रकल्प उभारणीचे ठरविले. कारखान्याने प्रथम टप्प्यात ६ मेगावॅट सहविजनिर्मीती प्रकल्प सुरु केला. त्यानंतर मा. संचालक मंडळाने नवीन १२ मेगावॅट सहवीजनिमती प्रकल्प उभारणीचा निर्णय घेवून हंगाम २०१२-२०१३ मध्ये सदर प्रकल्पाची उभारणी पूर्ण करुन प्रकल्प कार्यान्वीत केला आहे. सहवीजनिर्मीती प्रकल्प दिनांक-५/१/२०१३ रोजी पूर्ण कार्यक्षमतेने सुरु केलेला आहे.

२) आसवनी (डिस्टीलरी) प्रकल्प
रेक्टीफाइड स्पिरीट ३० हजार लिटर प्रतिदिनी आणि २८ हजार २०० लिटर इथेनॉलची निर्मीती करत आहोत. खास वैशिष्टे म्हणजे स्पेंटवॉशमुळे कोणतेही प्रदुषण होवू न देता टाकाऊतून टिकावू उक्तीप्रमाणे बायोकंपोस्टींगचा खतप्रकल्प तसेच महाराष्ट्रातील पहिला अद्ययावत कंपोस्ट यार्ड तयार केला आहे. त्यानुसार त्यामध्ये निसोरा नावाचे सेंद्रीय खत तयार करुन ते शेतकऱ्यांना उधारी तत्वावर वाटप करण्यात येते. त्यामुळे एकरी उत्पादन वाढीस मदत होते.

३) श्री विघ्नहर ट्रस्ट संचलित स्व. निवृत्तीशेठ शेरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था
संस्थेत ८ व्यवसाय कोर्स चालू असून २७१ विद्यार्थी उत्तम व्यावसाय शिक्षण घेत आहेत. आमच्या आय.टी.आय. मधून शिक्षण घेतलेल्या मुलांना चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या असून, काही विद्यार्थी उत्तम व्यवसाय देखिल करत आहेत.

४) श्री विघ्नहर ट्रस्ट संचलित स्व. प्रा. रामकृष्णजी मोरे इंग्लिश मिडियम स्कुल
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर इंग्रजी माध्यमाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. शाळेत ज्युनिअर के.जी. २ तुकड्या, सिनिअर के.जी. २ तुकड्या, इयत्ता १ ली व २ री प्रत्येकी ३ तुकड्या, इयत्ता ३ री २ तुकड्या, इयत्ता ४ थी ३ तुकड्या व इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी पर्यन्त प्रत्येकी १ तुकडी याप्रमाणे एकूण ७८७ मुले, मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना येणे-जोणेसाठी एकूण ११ स्कुलबसची व्यवस्था केलेली आहे.

५) कारखाना प्रशासकिय इमारत
कारखान्याच्या वैभवाला शोभेल, अशी वास्तु कारखान्याने उभारली असून, वास्तूशिल्प म्हणून शोभावे अशी सर्वसोईंनी युक्त प्रशासकिय इमारत कारखान्याच्या वैभवशाली परंपरेत भर टाकणारी आहे.

६) मंदीर जिर्णोध्दार
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील तमाम आदिवासींचे श्रध्दास्थान व कुकडीनदीचा उगम जेथून होतो तेथे पुरातन कुकडेश्वराचे शिवमंदीराचा जिर्णोध्दार कारखान्याने करावा असा संकल्प स्व. माजी खासदार मा. निवृत्तीशेठ शेरकर यांनी केला होता. सदरचे मंदीराचा जिर्णोध्दार शासनाच्या मान्यतेने कारखान्याने पूर्ण केलेला आहे. त्यासाठी सुमारे ६५ लाखांचा खर्च आलेला आहे.

७) स्मारके
आमचे आराध्यदैवत माजी खासदार व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. निवृत्तीशेठ शेरकर आणि महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांची प्रेरणा सदैव मिळत रहावी या उद्देशाने महापुरुषांचे पुतळे कारखाना कार्यस्थळावर वैभवशाली परंपरेचा जनक म्हणून सर्वांना दर्शन देत आहेत, अशी भावना सर्व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व तालुक्यातील आम जनतेच्या चिरकाल स्मरणात आहे.

८) ठिबक सिंचन योजना
राज्यात मोठया प्रमाणात असणारी अवर्षण स्थिती लक्षात घेता ठिबक सिंचन योजना राबविणे अत्यंत आवश्यक बाब झालेली आहे. पाण्याचा अपव्यय टाळणेसाठीचा दृष्टीकोन ठेवून कारखान्यामार्फत ठिबक सिंचन योजनेस मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देवून प्रभावीपणे ही योजना राबवित आहोत.

९) कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२०-२१ चा आढावा
सन २०२०-२१ गळीत हंगामामध्ये कारखान्याने जास्त दिवस गाळप हंगाम सुरु ठेवून १० लाख २१ हजार ३५० मे. टन ऊसाचे गाळप करुन ११ लाख ४२ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. त्याचबरोबर ११.१७ % साखर उतारा राखण्यात यश मिळविले आहे. तसेच कारखान्याचे डिस्टीलरी आणि सहवीजनिर्मीती प्रकल्प पूर्ण क्षमतेने व यशस्वीपणे चालवून यावर्षी डिस्टीलरीमधून ५२ लाख ५३ हजार लिटर अल्कोहोलची निर्मीती केली व १४ लाख ५० हजार लिटर इथेनॉलची निर्मीती केली. त्याचबरोबर सहवीजनिर्मीती प्रकल्पातून ३ कोटी ८९ लाख १९ हजार युनिट निर्यात केली असून दि. ३०/४/२०२१ रोजी गाळप हंगामाची सांगता करण्यात आली आहे.

१०) गाळप हंगाम २०२१-२२ उद्दिष्ठ :

अ. हंगामासाठी उपलब्ध ऊस क्षेत्र : २४.७५० एकर

ब. गाळपाचे उद्दिष्ठ : १०,२५,००० मे. टन